Vadgaon Maval: पुलाचे रखडलेले काम त्वरीत पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- सायली म्हाळसकर

वडगाव हे तालुक्याचे महत्त्वाचे शहर असून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये शहरात आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई महामार्ग (जुना) येथील रस्त्यावर शेतकी फार्म जवळील जीर्ण अवस्थेतील पूल तोडून त्याठिकाणी काही महिन्यांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अद्यापही पुलावरील डांबरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत पडून आहे. यामुळे मोठी गैरसोय होत आहे. या पुलाचे डांबरीकरण त्वरीत करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडगावच्या नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव हे तालुक्याचे महत्त्वाचे शहर असून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये शहरात आहेत. त्यामुळे कामकाजाच्या निमित्ताने हजारो नागरिक दररोज याच रस्त्यावरून शहरात येत- जात असतात. त्यामुळे डांबरीकरणा अभावी रखडून पडलेल्या कच्च्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून चिखल होऊ लागला आहे.

त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने पुलाचे डांबरीकरण त्वरित व्हावे, यासाठी नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी उप अभियंता अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रखडलेल्या पुलाचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

हे काम पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विकास साबळे, विक्रम कदम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.