Vadgaon Maval : किरकोळ कारणावरून ट्रक चालकाचा खून; फिर्यादीच निघाला आरोपी

एमपीसी न्यूज – ट्रकमध्ये स्वयंपाक करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ट्रकचालकाने सहकारी ट्रक चालकाचा कांदा कापण्याच्या सुरीने खून केला. ही घटना वडगाव-तळेगाव फाट्यावर बुधवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनतर आरोपी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आला असता त्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

बांकेलाल जयनारायन ओझा उर्फ गौडा (वय 38, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. राकेश जगजीतसिंग यादव (वय 44, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गौडा आणि आरोपी यादव दोघेही ट्रकचालक आहेत. ते बुधवारी मुंबईकडून अहमदनगरकडे ट्रक घेऊन जात होते. दुपारी जेवण करण्यासाठी ते वडगाव-तळेगाव फाट्यावर थांबले. ट्रक थांबवून स्वयंपाक सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातच यादव याने गौडा यांच्या छातीवर कांदा कापण्याच्या सुरीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या गौडा यांचा त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, घटना घडल्यानंतर यादव पोलिसांसमोर हजर होऊन आपल्या मित्राचा अज्ञातांनी खून केल्याचे सांगू लागला. त्याच्या बोलण्यातून पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी यादव याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीमध्ये यादव पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच यादव गयावया करत आपणच खून केल्याचे सांगू लागला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like