Vadgaon Maval: नगरपंचायत कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, सत्ताधारी व विरोधकांची एकच मागणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, नगरपंचायतीच्या विविध विभागातील कर्मचारी जोखीम पत्करुन कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

एमपीसी न्यूज- वडगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना जोखीम पत्करून काम करावे लागत असल्याने त्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी केली आहे.

वडगाव नगरपंचायत परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, नगरपंचायतीच्या विविध विभागातील कर्मचारी जोखीम पत्करुन कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. दुर्दैवाने कोरोनामुळे एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी प्रशासनाने खंबीरपणे उभे राहायला हवे.

त्यासाठी नगरपंचायतीतील कर्मचार्‍यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन नगरसेवक, आरोग्य समितीचे सभापती राजेंद्र कुडे यांनी नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे देऊन मागणी केली आहे.

याप्रसंगी सत्ताधारी आघाडीचे गटनेते राजेंद्र कुडे, गटनेत्या प्रमिला बाफना, उपनगराध्यक्षा माया चव्हाण, नगरसेवक सुनिल ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, शारदा ढोरे, पुनम जाधव, पुजा वहिले, सायली म्हाळसकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

तसेच विरोधी पक्षाचे गटनेते दिनेश ढोरे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी व विरोधकांची एकच मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.