Vadgaon Maval News : डेअरीने स्वबळावर काम करून स्वयंपूर्ण होण्याची हीच योग्य वेळ ; मावळ डेअरी प्रकरणी टाटा पॉवरचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – डेअरीने स्वबळावर काम करू लागण्याची आणि स्वयंपूर्ण होण्याची हीच योग्य वेळ आहे. पुढे जाऊन प्रकल्प संचालनाची संपूर्ण जबाबदारी महिला शेतकऱ्यांन्याच घ्यावी लागणार याची पूर्ण कल्पना महिलांना होती. प्रकल्पात मावळमधील महिलांनी केलेल्या गुंतवणुकीची परतफेड एएलसी इंडिया करेल तसेच, ते प्रकल्प स्वतंत्रपणे पुढे चालवत राहतील. असे स्पष्टीकरण टाटा पॉवर कंपनीने मावळ डेअरी प्रकरणी दिले आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, 2015 साली टाटा पॉवरने सीएसआर संपूर्णपणे महिलांद्वारे संचालित मावळ डेअरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी पाठिंबा दिला. फक्त प्रकल्प अंमलबजावणीच्या काळात म्हणजे 3 वर्षांच्या पहिल्या टप्प्यात पाठिंबा देण्याचे टाटा पॉवरने सुरुवातीला ठरवले होते. या कालावधीत कंपनीने डेअरी स्थापन करण्यात, स्थानिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आणि पशुधन केंद्रे स्थापन करण्यात या समुदायाला मदत करण्यासाठी ‘एएलसी इंडिया’च्या सेवांना यामध्ये समाविष्ट करून घेतले. डेअरी उभारण्यासाठी टाटा पॉवरने व्याजमुक्त, परत करण्यायोग्य मूळ भांडवल देखील पुरवले. 2017 साली प्रति दिन 10 हजार लिटर एकूण क्षमतेच्या डेअरी प्लांटच्या जमीन खरेदीसाठी कंपनीने अतिरिक्त अनुदान दिले.

_MPC_DIR_MPU_II

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एप्रिल 2018 ते मार्च 2020 अशी आणखी दोन वर्षे देखील कंपनीने या प्रकल्पाला आपला पाठिंबा कायम ठेवला. यानंतर डेअरीने स्वबळावर काम करू लागण्याची आणि स्वयंपूर्ण होण्याची ही योग्य वेळ आहे असा विचार कंपनीने केला. 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्व महिला संचालक आणि एएलसी इंडिया प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या संचालक मंडळाच्या बैठकीपर्यंत फॅसिलिटेटर म्हणून आपली भूमिका टाटा पॉवरने पार पाडल्याचे त्यांनी जाहिर केलं.

एएलसी इंडियाच्या प्रस्तावानुसार डेअरी प्रकल्पात मावळमधील महिलांनी केलेल्या गुंतवणुकीची ते परतफेड करतील आणि हा प्रकल्प एएलसी इंडिया स्वतंत्रपणे पुढे चालवत राहील. शिवाय सामंजस्यपूर्वक ठरवण्यात आलेल्या अटी व शर्तींनुसार सर्व महिला एएलसीसोबत काम करत राहतील. यामुळे डेअरी कंपनीवरील कर्जाचा बोजा दूर होईल. डेअरी प्रकल्पासोबत राहायचे किंवा त्यामधून बाहेर पडायचे याचा निर्णय मावळच्या महिलांनी घ्यायचा आहे आणि तो एएलसी इंडियाला कळवायचा आहे. असे या केपनीच्या निवेदनात म्हंटले आहे.

दरम्यान, टाटा कंपनीने डेअरी प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतल्याने डेअरी प्रकल्पाच्या महिला संचालकांनी डेअरीच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारापासून (दि.27) उपोषण सुरू केलं आहे. प्रकल्पासाठी दहा कोटी रूपयांचे कर्ज घेतले आणि डेअरी प्रकल्पाच्या डोक्यावर कर्ज लादून कंपनी ऐनवेळी प्रकल्पातून माघार घेतली आहे, असा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे. कंपनीने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी या महिला उपोषण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.