Vadgaon Maval : घरफोडी करणा-या सराईताला स्थानिक गुन्हे शाखेने ‘खिंडी’त पकडले

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ आणि पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या एका सराईताला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उर्सेखिंड येथून अटक केली. त्याच्याकडून 3 लाख 84 हजार 205 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन आणि पौड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

कबीर बाबु राजपूत ऊर्फ मनावत (रा.पुसाणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक लोणावळा उपविभागात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, चोरी व जबरी चोरी करणारा आरोपी कबीर हा तळेगाव चौक, उर्सेखिंड येथे येत आहे. त्यानुसार पोलिसांनी खिंडीत सापळा रचून कबीरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अमित भगवानदास राठोड (रा. ढोणे, ता. मावळ) याच्यासोबत मिळून वडगाव मावळ हद्दीत दोनदा चेन स्नॅचिंग, कान्हेफाटा येथे घरफोडीचे गुन्हे व पिरंगुट येथे घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्याकडून 3 लाख 84 हजार 205 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. यामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन आणि पौड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.