Vadgaon Maval: मावळ तालुक्यातील खरीप भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

मावळ तालुक्यातील काही गावांमधील खरीप भात पिकाचे शेंडे करपू लागले असून भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्याने फवारणी करणे अडचणीचे झाले आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील खरीप भात पिकावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाने तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मावळ तालुक्यात यावर्षी खरीप भात पिकाच्या सुमारे 12 हजार 672 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेल्या आहेत. पूर्ण ऑगस्ट महिन्यात भात पिकाला पोषक असा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे भात पीक चांगले आणि जोमात आले आहे. खरीप भात पिकांपैकी काही भागातील शेतावर भातावर ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेले आहे.

यावर्षी प्रथमच मावळ तालुक्यात 104 टक्के भात लागवड झालेली आहे. मावळ तालुक्यातील काही गावांमधील खरीप भात पिकाचे शेंडे करपू लागले असून भात खाचरामध्ये भरपूर पाणी असल्याने फवारणी करणे अडचणीचे झाले आहे. उत्तम पीक आलेले असताना या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग हादरला आहे.

राज्यशासनाचा कृषी विभाग आणि पंचायत समिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना औषधे पुरवावीत अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.