Vadgaon Maval : खेळाडूंनी मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे -आदिती तटकरे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.

वडगाव मावळ येथे नगराध्यक्ष चषक क्रीडा महोत्सवातील विजेता खेळाडूंना व राष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या खेळाडूंचा क्रीडा राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष मयुर ढोरे, बबनराव भेगडे, बाबा ढोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आदी उपस्थित होते.

क्रीडा राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, नगराध्यक्ष चषक स्पर्धा ही ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्यातील क्रीडा गुण वाढीसाठी तसेच खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी या क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील खेळ टिकून राहिले पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. ही कौतुकास्पद बाब आहे.

खेलो इंडियात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केल्याचे सांगून क्रीडा राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या राज्यातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धासांठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सांगून नगराध्यक्ष चषकच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा, वेटलिफ्टिंग स्पर्धेतूनही अनेक खेळाडू पुढे येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार सुनील शेळके म्हणाले, ग्रामीण भागातील युवक युवतींना या क्रीडा स्पर्धा व्यासपीठ उपलब्ध करून देतात. या खेळाडूंसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी नगराध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. यावेळी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.