Vadgaon Maval : घोरावडेश्वर डोंगरावर आग लावणा-या दोघांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज- घोरावाडी जवळ असलेल्या घोरावडेश्वर डोंगरावर सिगारेट पेटवताना जळती आगकाडी गवतात टाकून डोंगराला आग लावली. यामध्ये वनसंपदेचे नुकसान झाले. याप्रकरणी दोन आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आकाश चंद्र परमहंस पांडेय, ब्रिजेश श्रीमणिराम मौर्य अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी आकाश आणि ब्रिजेश हे दोघेजण दुचाकीवरून बुधवारी (दि. 6) घोरावाडी डोंगरावर आले. त्यांनी डोंगरावर बसून सिगारेट पेटवली आणि जळती आगकाडी डोंगरावरील गवतात टाकली. त्यामुळे डोंगरावर वणवा लागला आणि डोंगरावरील काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सदस्य आणि स्थानिक निसर्गप्रेमींनी वनरक्षक भुजबळ आणि वनकर्मचा-यांना ही बाब सांगितली. सर्वानी मिळून आग विझवली.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेल्या झाडांना जगविण्यासाठी मंडळाच्या वतीने अहोरात्र परिश्रम केले जात आहेत. डोंगराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत पाणी वाहून नेले जात आहे. सावरकर मंडळाच्या निसर्गप्रेमींच्या परिश्रमाने काही झाडे तग धरून वाढत आहेत. मात्र लागलेल्या आगीमध्ये यातील काही झाडे जळून गेली. स्थानिक निसर्गप्रेमींनी ‘हॅलो फॉरेस्ट’ अंतर्गत या आगीबाबत तक्रार नोंदविली. वनविभागाने तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.