Vadgaon Maval : उद्यापासून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीने उद्या, शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश कुडे आणि समितीचे पदाधिका-यांनी दिली.

शुक्रवार (दि. 19 ) रोजी पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्म सोहळा, सात वाजता आळंदी येथील बाल भजनी मंडळ यांचे भजनाने पालखी मिरवणूक व छबिना, चार वाजता मानाचे बगाड व मानाच्या काठया, रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम व रात्री नऊ वाजता भजन स्पर्धा होईल.  भजन स्पर्धेसाठी पाच क्रमांक ठेवण्यात आले आहेत.

प्रथम क्र 11 हजार 111 रूपये, द्वितीय क्र- 7 हजार 777 रूपये, तृतीय क्र- 5 हजार 555 रूपये, चतुर्थ क्र- 4 हजार 444 रूपये, पंचम क्र- 3 हजार 333 रूपये तसेच उत्कृष्ट गायक, वादक व हार्मोनिअम वादकांना वैयक्तिक बक्षीस दिले जाणार आहे.

शनिवारी (दि 20) सकाळी पालखी मिरवणूक व दुपारी चार वाजता डी एड काॅलेजच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा होणार असून यासाठी 51 रूपये पासून 10 हजार रूपयांपर्यंत रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहेत. सायंकाळी सात वाजता पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात ‘ लावण्यखणी ” हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल.

सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरीकांनी या सर्व कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.