Vadgaon Maval : मावळच्या प्रतीक देशमुख याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज- राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या प्रतीक शंकर देशमुख याने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात ८५ किलो वजनीगटात दिल्लीच्या जतीनला चारीमुंड्या चीतपट करून सुवर्णपदक पटकाविले आहे. प्रतीक याने यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने राजस्थान (कोटा) येथे 15 वर्षाखालील युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल प्रतीक देशमुख याने ८५ किलो वजनी गटात नेत्रदीपक कुस्त्या करून महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले.

प्रतीकने पहिल्या लढतीत उत्तराखंडच्या उमांगचा ७-२ असा, तर दुसऱ्या लढतीत हरियाणाच्या हितेशचा ९-२ ने पराभव करून उपांत्यफेरी गाठली होती. उपांत्यफेरीत मध्यप्रदेशच्या राज यादवचा ८-० अशा गुणाधिक्याने एकतर्फी पराभव करत प्रतीक याने अंतिमफेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने दिल्लीच्या जतीनला चारीमुंड्या मुंड्या चीतपट करत सुवर्ण पदक पटकाविले. प्रतीकने तीन राष्ट्रीय स्पर्धांपैकी दोन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे.

प्रतीक हा पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात कुस्तीचे धडे घेत आहे. त्याला वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे, किशोर नखाते, वीरेंदर कुमार, दिलीप पडवळ, निलेश पाटील, परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्याच्या यशाबद्दल मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मारुती आडकर, पै. चंद्रकांत सातकर, कार्याध्यक्ष संभाजी राक्षे, रामनाथ वारिंगे, सचिव बंडू येवले, उपाध्यक्ष खंडू वाळूंज, मनोज येवले, सचिन घोटकुले, पप्पू कालेकर, ज्ञानेश्वर काकडे, तानाजी कारके, विष्णू शिरसाट, राजू बच्चे, देविदास कडू, किशोर सातकर, काळूराम असवले यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like