Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीसाठी ऑनलाईन कर भरणा सुविधा उपलब्ध करा- सायली म्हाळसकर

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या मिळकतदारांना आपला मिळकतकर व इतर कर वेळेत घरबसल्या भरता यावा म्हणून ऑनलाईन भरणा सुविधा उपलब्ध करा, आशा मागणीचे पत्र आज मनसेच्या नगरसेविका सायली रूपेश म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांना दिले, तसेच मिळकतदारांना वेळेत मिळकत कर भरण्याची इच्छा असूनही मिळकतदार वेळेअभावी व नगरपंचायतीच्या गैरसोयीमुळे मिळकतकर भरू शकत नाही.

यासाठी वडगाव नगरपंचायतीने घरपट्टी/पाणीपट्टी व इतर कर भरण्यासाठी जर ऑनलाईन भरणा सुविधा उदा. (BHIM App, GOOGAL Pay, PHONE Pay, PAYTM, QR कोड) उपलब्ध केल्यास ज्या मिळकतदारांना नगरपंचायत कर वेळेत भरायचा आहे, पण वेळेअभावी भरू शकत नाही, अशा मिळकतदारांना घरबसल्या आपला कर भरता येईल. परिणामी नगरपंचायतीचा मोठ्या प्रमाणावर वेळेत करभरणा होऊ शकेल आणि थकबाकीचे प्रमाणही कमी होईल.

तसेच नगरपंचायतीचा अंदाजपत्रकाचा आजपर्यंतचा एकूण आढावा घेता नगरपंचायतची मोठी करवसुली थकीत असल्याचे निदर्शनास येते, ती कमी करून वेळेत कर जमा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास सर्वांनाच ते खूप सोईचे होईल. त्यामुळे नियमित बॅंकेत पैसे जमा होतील आणि आर्थिक भ्रष्टाचार /अनियमितता टाळता येऊ शकते, असा विश्वास या वेळी सायली म्हाळसकर यांनी नगराध्यक्षांच्या समोर व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.