Vadgaon Maval : कायदेविषयक शिबिरात बालहक्क व मुलांचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- विधी साहाय्य समिती, वडगाव मावळ बार असोसिएशन व पंचायत समिती मावळ यांचे संयुक्त विद्यमाने बाल दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालहक्क, बालदिन, मुलांचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. बुरांडे, आर. के. गायकवाड, श्रीमती पी. एम. सुर्यवंशी, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुकाराम काटे उपस्थित होते. यावेळी वकील सुप्रिया तिखे, विदुला वर्तक, अर्चना ढोरे, केंद्र प्रमुख धोत्रे मॅडम, मुख्याध्यपिका गोडसे मॅडम तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता.

बालदिन या विषयावर अॅड. कविता तोडकर यांनी आपले विचार मांडले. बालदिन साजरा करण्यामध्ये पंडीत नेहरु यांचे खूप मोठे योगदान आहे तसेच लहान मुलांना शिक्षा न देण्याबाबतचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे. लहान मुलांना शिक्षा करु नये असे त्यांनी आवाहन केले.

बालहक्क या विषयावर न्यायाधीश आर. के. गायकवाड यांनी उपस्थित लहान मुलांबरोबर संवाद साधत घटनेने मुलांना काय हक्क वा अधिकार दिलेले आहेत याची माहिती दिली. आपण आपले अधिकार कसे वापरले पाहिजेत हे उदाहरण देऊन मुलांना सांगितले.

मुलांचे भवितव्य या विषयावर न्यायाधीश श्रीमती पी. एम. सुर्यवंशी म्हणाल्या, ” प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी विशेष गुण असतो तो ओळखून त्याचा विकास केला पाहिजे. भविष्यात मुलांनी शेतकरी सुध्दा बनावे तसेच आपण कितीहि मोठे झालो तरी कोणत्याहि चांगल्या कामाची आपण लाज बाळगु नये”

मुलांनी बालदिन तसेच पंडीत नेहरु यांच्या विषयी भाषणांमधुन माहिती दिली व मुलांनी सामुहिक गाणी सादर केली. त्याचबरोबर वडगाव मावळ बार असोसिएशन व विधिसेवा समिती तर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अॅड. तुकाराम काटे यांनी केले.

सुत्रसंचालन वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव अॅड. महेंद्र खांदवे व शिक्षिका घोरपडे मॅडम यांनी केले. आभारअॅड. जयश्री शितोळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.