Vadgaon Maval : धक्कादायक! ब्लॅकमेल करुन अल्पवयीन मुलीवर पेट्रोल पंपावर बलात्कार

पंपावर काम करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर झाडू मारण्याचे काम करणा-या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर पेट्रोल पंपावर काम करणा-या दोघांनी बलात्कार केला. हा प्रकार वडगाव मावळ येथील भारत पेट्रोल पंपावर घडला. पोलिसांनी बलात्कार करणा-या दोन्ही नराधमांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात वडगाव पोलिसांनी पेट्रोल पंप चालकाला पाठीशी घालून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप वुमेन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी केला आहे.

गणेश कृष्णा भोसले, राजू उर्फ राजकुमार आनंदराव मामीलवाड (दोघे रा. वडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिडीत मुलीच्या 32 वर्षीय आईने याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला भारत पेट्रोल पंपावर झाडू मारण्याचे काम करते. 31 ऑक्टोबर रोजी तिने तिच्या अल्पवयीन मुलीला पंपावर झाडू मारण्यासाठी सकाळी सहा वाजता पाठवले. झाडू मारून मुलगी उशिरापर्यंत आली नाही, म्हणून दुसरी मुलगी आणि मुलाला पाठवून चौकशी करण्यास सांगितले. पिडीत मुलगी पंपावर नसल्याचे समजल्यानंतर फिर्यादी स्वता त्यांच्या नातेवाईकांसोबत पंपावर चौकशीसाठी गेल्या. पंपावर काम करणा-या आरोपींनी सांगितले की, मुलगी सकाळी झाडू मारून गेली आहे.

फिर्यादी यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. फिर्यादी मुलीच्या मिसिंग होण्याची तक्रार देण्यासाठी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गेल्या असता त्यांची मुलगी तळेगाव येथे सापडल्याचे समजले. तिला पोलिसांनी विचारले असता तिने सांगितले की, “पंपावर काम करणा-या गणेश सोबत प्रेम असून आमचे भांडण झाल्याने मी निघून गेले.”

फिर्यादी महिलेने मुलीला घरी गेल्यानंतर विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने सांगितले की, “10 ऑगस्ट रोजी सकाळी आरोपी गणेश भोसले याने तिच्यासोबत प्रेम असल्याचे सांगून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यानंतर मुलीचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याच्या धाकाने आणखी पाच वेळा बलात्कार केला आहे.

16 ऑक्टोबर रोजी आरोपी गणेशचा मित्र आरोपी राजू याने मुलीला फोन करून त्याच्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला आहे. यावरून पंपावर काम करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, वुमेन्स हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक्षा नीता परदेशी, शहर अध्यक्षा अॅड. सारिका परदेशी, अलका भास्कर, वंदना पिल्ले, सारिका कांबळे आदींनी वडगाव पोलीस ठाण्यात जाऊन पिडीत मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर “पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ तसेच विलंब केल्याचे समोर आले. वडगाव पोलिसांनी पिडीत मुलीला आणि तिच्या आईला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून घेतले. त्यानंतर रात्री गुन्हा नोंदवून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवले असल्याचा आरोप नीता परदेशी यांनी केला.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.