Vadgaon Maval: श्री पोटोबा महाराजांचा चैत्र पौर्णिमेला होणारा उत्सव रद्द

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा चैत्र पौर्णिमेला होणारा उत्सव रद्द करण्यात आला असून फक्त पुजारी व विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक, श्रीहनुमान जन्म, पालखी हे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत तसेच पारंपरिक मानाच्या बगाडाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी दिली.

देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,उपाध्यक्ष गणेश ढोरे, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे, अॅड अशोक ढमाले, अॅड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीता कुडे यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात तहसीलदार मधुसूदन बर्गे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याशीही चर्चा करण्यात आली.

सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचा उत्सव रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या संकटामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, या भावनेतून यंदाचा उत्सव रद्द करून फक्त पुजारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत श्रींचा अभिषेक, श्री हनुमान जन्म, पालखी व सायंकाळी आरती आदी कार्यक्रम होतील. धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त पूर्ण दिवस मंदिर बंद ठेवले जाणार असून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी अथवा नैवेद्य दाखविण्यासाठी न येता आपल्या घरातूनच नैवेद्य दाखवावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like