_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थान संस्थान काकडा आरती सोहळ्याची मंगळवारी सांगता

एमपीसी न्यूज- श्री पोटोबा देवस्थान संस्थान, काकडा आरती सोहळा समिती यांचे वतीने आयोजित केलेल्या काकडा आरती सोहळ्याची सांगता मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेला ह.भ.प. केदार महाराज भेगडे यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. अशी माहिती देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, काकडा आरती सोहळ्याचे अध्यक्ष विणेकरी ह.भ.प. बबनराव भिलारे यांनी दिली आहे.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेला काकडा आरती सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होतो. संपूर्ण मावळ तालुक्यातील गावोगावी भक्तीमय वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती सुरू झाल्याने सगळीकडेच अत्यंत प्रसन्न आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. श्री पोटोबा देवस्थान येथे काल्याच्या कीर्तनानंतर ग्रामदिंडी प्रदक्षिणा व महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे संयोजन शंकरराव म्हाळसकर, देवस्थानचे सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, नारायण ढोरे, शिवाजी शिंदे, मधुकर पानसरे, संतोष ढोरे, महेंद्र ढोरे, हरियाली पानसरे,नरेंद्र ढोरे, पुजारी मधुकर गुरव आदींसह काकडा आरती भजनी मंडळ करत आहे.

भल्या पहाटे तालुक्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहे. महिला भगिनी आरतीचे ताट घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रोज सकाळी काकड आरती, अभंग, भूपाळया, आंधळे- पांगूळ, वासुदेव, रूपकाचे अभंग, गौळणी महाआरती द्वारे पूजा केली जाते व तीर्थप्रसाद दिला जातो.

_MPC_DIR_MPU_II

काकड आरती पुजेचा मान गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळत असतो. ज्या दिवशी पूजेचा मान असतो त्या दिवशी संपूर्ण कुटुंब अबालवृद्धांसह पहाटे मंदिरात येऊन यथासांग पूजा करून मूर्तींना सुंदर हार घालून, प्रांगणात आकर्षक रांगोळी व मंदिरात अतिशय सुंदर सजावट केली जाते. त्यामुळे एकूणच मंदिरात भक्तीमय वातावरण व प्रसन्नता निर्माण होत असते.

‘भल्या पहाटे … उठा जागे व्हारे आता l स्मरण करा पंढरीनाथा l भावे चरणी ठेवा माथा l चुकवी व्यथा जन्माच्या… ‘ अशा प्रकारचे संताचे अभंग आळवून झोपलेल्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न या काकड आरतीच्या माध्यमातून केला जातो आहे.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात अर्थात त्या दिवसापासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांचे आराध्य देवात श्री पांडुरंग हे शयन करीत असतात अशी श्रद्धा आहे. म्हणजेच अश्विन शु पौर्णिमा ते कार्तिक शु पौर्णिमा या कालावधीत काकडारती उत्सव होत असतो. ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा l झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा l संत साधुमुनी अवघे झालेती गोळा l सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा ll’ अशा काकड आरतीच्या अभंगातून गावागावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. संताची भूमी असलेल्या मावळ तालुक्याचे सांस्कृतिक वैभव टिकून आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1