Vadgaon Maval: रुग्णांकडून वारेमाप पैसे उकळल्यास कारवाई करु, तहसिलदार बर्गे यांचा इशारा

vadgaon maval: tahshildar madhusudhan barge warns private doctors who taken huge fee from corona patient दरपत्रक रूग्णालयात लावा, रूग्णांसाठी 50 टक्के बेड आरक्षित ठेवा. दररोज घेतलेल्या स्वॅब चाचणी व त्यांचा अहवाल प्रशासनाला कळवावा.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या या संकटकाळी माणुसकी जपा, शासनाच्या दरपत्रकाप्रमाणे बिल आकारा, ही वेळ पैसे कमवण्याची नाही. रूग्णांकडून वारेमाप पैसे उकळू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्याकडील संदर्भ क्र 6 च्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा घटना व्यवस्थापक संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाने आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.

त्यानुसार तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालल्याने ती संख्या कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी तालुक्यातील खासगी रूग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी नायब तहसीलदार आर व्ही चाटे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, गटविकासाधिकारी सुधीर भागवत, वैद्यकीय अधिकारी गणेश बागडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी तहसीलदार बर्गे म्हणाले की, दरपत्रक रूग्णालयात लावा, रूग्णांसाठी 50 टक्के बेड आरक्षित ठेवा. दररोज घेतलेल्या स्वॅब चाचणी व त्यांचा अहवाल प्रशासनाला कळवावा. हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

डॉ. जी जी जाधव ग्रामीण रूग्णालय, कान्हे व डॉ. राहुल कदम उपकोषागार अधिकारी वडगाव मावळ या दोन अधिका-यांची समिती नेमली आहे.

खासगी रूग्णालयात दाखल रूग्णांच्या वैद्यकीय देयकांची पडताळणी करण्यासाठी ही समिती नेमली आहे. हे अधिकारी संयुक्तरित्या खासगी रूग्णालयास भेट देऊन वैद्यकीय बिलाची पडताळणी करतील व तसा दैनंदिन अहवाल तहसीलदार व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करतील.

शासनाने निश्चित केलेले दर

रूग्णालयात आयसोलेशन व सर्वसाधारण उपचार केल्यास प्रतिदिन चार हजार रुपये, आयसीयूत आयसोलेशन करून व्हेंटिलेटर न लावता उपचार केल्यास प्रतिदिन सात हजार पाचशे रुपये, व्हेंटिलेटर वापरल्यास प्रतिदिन नऊ हजार रुपये बिल आकारावे. यामध्ये देखरेख, बेड, नर्सेस, सलाईन, जेवण, एक्सरे व अन्य टेस्ट आदी सुविधांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.