Vadgaon Maval : कर्जत कारागृहातून पळालेल्या दोघांना वडगाव मावळमधून अटक; पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर पोलिसांची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – कर्जत दुय्यम कारागृहातून कारागृहाच्या छताचे लोखंडी गज वाकवून आणि कौले उकलून पाचजण पळून गेले होते. चौघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून चौघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असताना चौघांनी कोठडीतून पलायन केले. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. एकाला इंदापूर तालुक्यातील न्हावी मधून तर दोघांना मावळ तालुक्यातील वडगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (वय 35, रा. कवडगाव, ता. जामखेड) अशी वडगाव मावळ मधून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. म्हाळंगी, ता. कर्जत) असे न्हावी येथून ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय रामदास राऊत (रा. पारेवाडी, ता. जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा. पारेवाडी, ता. जामखेड) हे दोघे अदयाप फरार आहेत.

अहमदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याच्यावर चोरी आणि शस्त्र बाळगल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. मोहन भोरे, अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गंगाधर जगताप याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सर्व आरोपींवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता आरोपींनी कर्जत दुय्यम कर्जागृहाच्या छताचे गज वाकवले. छतावरील कौले काढून पळून गेले.

कारागृहातून पाच आरोपी पळून गेल्याने राज्यभर खळबळ उडाली. तसेच कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सूचना दिल्या. अहमदनगर पोलिसांनीं स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलिसांची चार पथके तयार करून शोध सुरु केला.

दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वर कोल्हे आणि मोहन भोरे हे दोघेजण शिक्रापूर चाकण रोडने वडगाव मावळच्या दिशेने आले. टीव्हीएस स्टार सिटी (एम एच 42 / ए टी 7868) या दुचाकीवरून दोघेजण वडगाव मावळ येथे आल्याची माहिती अहमदनगर पोलिसांना मिळाली. अहमदनगर पोलिसांनी वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे पोलिसांना याबाबत माहिती दिली.

वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी तात्काळ परिसरात बंदोबस्त तैनात करून आरोपींचा शोध सुरु केला. आरोपी मोहन भोरे याचा भाऊ परमेश्वर भोरे वडगाव मावळ येथे एका इमारतीमध्ये राहत आहे. त्याची माहिती काढून इमारतीबाहेर सापळा रचून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर आणि मोहन यांना ताब्यात घेतले. दोघांकडून पळून जाण्यासाठी वापरलेली मोटारसायकल देखील जप्त केली.

या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गंगाधर जगताप या आरोपीला कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील न्हावी येथून ताब्यात घेतले. गंगाधर याने कर्जत कारागृहातून पळाल्यानंतर पिंपळवाडी गावातील एका ऊसतोड कामगाराची दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून पुन्हा त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. अदयाप दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.