Vadgaon Maval : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा तसेच राष्ट्रीय विधीसेवा समितीच्या विविध योजना या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी वडगाव मावळचे नगराध्यक्ष मयुर ढ़ोरे, वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. बुरांडे, वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुकाराम काटे, सचिव अॅड. महेंद्र खांदवे, पंचायत समिती मावळचे विस्तार अधिकारी एम.एम. कांबळे, अॅड. वैशाली साबळे उपस्थित होते.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा – 2005 या विषयावर अॅड. वैशाली साबळे यांनी मार्गदर्शन केले. साबळे म्हणाल्या, ” महिलांवर होणा-या हिंसाचारास आळा बसावा म्हणुन या कायद्याची निर्मिती केली आहे, महिलांनी या कायद्याचा वापर करणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीला या कायद्याने संरक्षण दिले आहे. या कायद्याचा योग्य वापर करून सर्व स्त्रियांनी भयमुक्त जीवन जगावे “असे त्यांनी आवाहन केले.

माहिती व तंत्रज्ञान कायदा – 2000 सायबर गुन्हे – जनजागृती या विषयावर वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव अॅड. महेंद्र खांदवे म्हणाले, ” आज आपण सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत तो खूप जपून करणे गरजेचे आहे, आपण सोशल मिडियावर करत असलेल्या पोस्ट यातुनही सायबर गुन्हा घडु शकतो याची आपल्याला कल्पना देखील नसते त्यामुळे सायबर एज्युकेशन होणे ही आज काळाची गरज आहे”

राष्ट्रीय विधीसेवा समितीच्या विविध योजना या विषयावर वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. “राष्ट्रीय विधीसेवा सामिती मार्फत समाजातील गरजु व्यक्तिंना आर्थिक तसेच न्यायालयिन मदत केली जाऊ शकते, कोर्टात दावे दाखल होण्याअगोदर वादामध्ये मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला जातो, सर्वसामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान देणे अशी विविध कामे केली जातात”

वडगाव मावळचे नगराध्यक्ष मयुर ढ़ोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कायदेविषयक माहितीची शिबिरे घेणे ही आज काळाची गरज आहे भविष्यत अशी शिबिरे मोठ्या प्रमाणात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच. समाजात वावरत असताना आपण सर्वांनी सद्सद्विवेक बुद्धी वापरुन कोणतेही कृत्य केल्यास गुन्हा घडणार नाही. सर्वसामान्यांनी कायद्याचे ज्ञान या शिबिराच्या माध्यमातुन घ्यावे असे सांगितले.

आपल्या प्रास्ताविकात वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. तुकाराम काटे म्हणाले, ” विधी सेवासमिती मार्फत अशा शिबिराचे आयोजन करून कायद्याबाबत सर्वसामान्यांना ज्ञान देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. सर्वसामान्यांना कायद्याची माहिती नसते ती देण्याचे काम आम्ही या अशा शिबिरांमधून सातत्याने करत आहोत”

यावेळी नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, पुजा वहिले, सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, पूनम जाधव, माया चव्हाण, दिलीप म्हाळस्कर, अॅड सुरेंद्र दाभाडे, जयश्री शितोळे, वाय. पी. गोरे, गणेश शिराळकर, सुभाष तुपे, रुबीया तांबोळी, कविता तोडकर, शैलेश पडवळ, सुप्रिय तिखे, विदुला वर्तक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव अॅड. महेंद्र खांदवे यांनी केले तर पूजा वहिले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.