Vadgaon Maval: विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, वधुच्या चुलत्यासह दोघांवर गुन्हा दाखल

Vadgaon Maval: Violation of social distance during marriage ceremony, case filed against bride's uncle and hotel owner विवाह सोहळ्यात परवानगीपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती

वडगाव मावळ – लग्नात सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचं पालन न करणाऱ्या आणि 50 व्यक्तींची परवानगी असताना ही अधिक व्यक्ती लग्नात आढळल्याने, वधुच्या चुलत्यासह हॉटेल चालकावर मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शुक्रवार (दि.19) दुपारी 12 च्या सुमारास येथील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीट येथे घडली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप घोटकर यांनी फिर्याद दिली आहे. राहुल रघुनाथ वरघडे (वय 32, रा. आर्डव ता. मावळ) व आकाश अनिल राऊत ( वय 26, रा. माळीनगर, वडगाव ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. मावळ) येथील हॉटेल श्रीकृष्ण व्हेज ट्रीटमध्ये विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या विवाह सोहळ्याला पोलिसांकडून 50 व्यक्तींसह रीतसर परवानगी देण्यात आली होती, यासाठी पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला होता.

शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं पालन करून विवाह होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस उप निरीक्षक दिलीप देसाई व होमगार्ड अनिकेत बोऱ्हाडे आदी कर्मचाऱ्यांनी विवाहस्थळी भेट दिली.
यादरम्यान, विवाहाच्या स्थळावर नियमांची पायमल्ली करत 60 ते 70 जण लग्नास उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचंही पालन होताना पोलिसांना दिसलं नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वधूचे चुलते राहुल रघुनाथ वरघडे आणि हॉटेलचे मॅनेजर आकाश अनिल राऊत यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188, 269 कोविड 19 उपाययोजना अधिनियम 2020 चे कलम 11 साथरोग नियंत्रक कायदा 1897 चे कलम 3 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 35 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संदीप घोटकर करत आहे. या कारवाईमुळे  मंगल कार्यालय व हॉटेल चालकांनी धसका घेतला आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी करू नये, घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.