Vadgaon Maval : वडगाव मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळसकर व उपसभापती शांताराम कदम यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त सभापतीपदाच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील यांची पंचायत समितीच्या हंगामी सभापतीपदी निवड करण्यात आली.

मावळते सभापती व उपसभापती यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या निर्णयानुसार पदांचा कार्यकाल संपल्याने पदाचे राजीनामे दिले होते. हे राजीनामे जिल्हापरिषदेमध्ये मंजूर झाल्याने मावळ पंचायत समितीची सभापती व उपसभापती दोन्ही पदे रिक्त झाली. त्यामुळे सभापतीपदाचे दैनंदिन कामकाज व कर्तव्यकार्य चालविण्याच्या दृष्टीने सभापतीची निवड करण्यासाठी दि (8 फेब्रुवारी) रोजी जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961चे कलम 75 अन्वये जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समितींच्या सभापतींच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये अर्थ, शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची चिठ्ठी निघाली त्यामुळे विवेक वळसे पाटील यांची पंचायत समितीच्या हंगामी सभापतीपदी निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केले. नवीन सभापतीची निवडणूक होईपर्यंत वळसे पाटील हे पंचायत समितीचे सभापती म्हणून कामकाज चालवतील. असे सांगण्यात आले आहे.

शुक्रवार दि 15 फेब्रुवारी 2019 रोजी होणा-या पंचायत समितीच्या सभेचे कामकाज सभापती वळसे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होईल. रिक्त झालेल्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी दि 18 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये निवडणूक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.