Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.

गणेश हरीदास आडबल (वय 33, रा. कान्हेफाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश हे कांदे-बटाट्याचे व्यापारी आहेत. ते लोणावळा, वडगाव मावळ, उर्से, टाकवे यांसारख्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये कांदे-बटाटे विक्रीचे दुकान लावतात. चाकण येथून माल भरून तो बाजाराच्या ठिकाणी नेऊन विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. प्रत्येक गुरुवारी वडगाव मावळ येथे आठवडे बाजार भरतो. पंचक्रोशीतील शेतकरी आणि व्यापारी या बाजारासाठी येतात. गुरुवारी सकाळी फिर्यादी गणेश आणि त्यांच्या आईने चाकण येथील बाजारातून वडगाव मावळच्या आठवडे बाजारात कांदे आणि बटाटे आणले.

वडगाव मावळ येथे पोटोबा मंदिराशेजारी असलेल्या बाजारपेठेत एका झाडाखाली ते त्यांचे दुकान लावत होते. गणेश आणि त्यांची आई दुकानावर ताडपत्री झाकण्यासाठी रस्सी ओढत होते. त्यावेळी गणेश यांची पैशांची पिशवी दुकानात ठेवली होती. अज्ञात चोरट्याने गणेश आणि त्यांच्या आईची नजर चुकवून पैशांची पिशवी पळवून नेली. पिशवीमध्ये ५० हजार रुपयांची रोख रक्कम होती. त्यांनी याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like