Vadgaon Maval : पार्थ राजकारणात आला तर बिघडले कोठे? – सुनेत्रा पवार

एमपीसी न्यूज – डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनिअरचा इंजिनिअर, शेतकऱ्याचा शेतकरी तर मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर बिघडले कोठे? असा रोखठोक प्रश्न करत सुनेत्रा पवार यांनी पार्थला मिळालेल्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय कवाडे गट,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी वडगाव मावळ येथे आज आयोजित मावळ तालुका महिला आघाडीच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

  • यावेळी व्यासपीठावर पार्थ पवार यांची आत्या नीता पाटील,पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा अर्चना घारे, तालुका अध्यक्ष सुवर्णा राऊत, अल्पसंख्यांक सेलच्या तालुका अध्यक्ष शबनम खान, जि. प. सदस्या शोभा कदम, वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका पुनम जाधव ,पूजा वहिले, शारदा ढोरे, माया चव्हाण, युवती तालुका अध्यक्ष सुमित्रा दौंडकर, ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात, सचिव पुष्पा घोजगे तसेच नीता पाटील, वर्षा जगताप आणि विक्रमी संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपाने उठविलेल्या राळेचा समाचार घेत सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, की शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारणातील योगदान देशाला माहीत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी वैयक्तिक पातळीवर टीकेची झोड उठवली आहे. विकासाचे वायदे किती पूर्ण केले हे सांगायचे सोडून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न ते करत आहेत. आज पार्थची ओळख पवार साहेबांचा नातू आणि अजितदादाचा मुलगा अशी असली तरी पाच वर्षानंतर मते मागताना त्याने केलेल्या मावळच्या विकासकामांची ओळख सांगूनच येऊ. पार्थ आपल्या कामातून लोकांचा विश्वास सार्थ करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • मावळच्या खासदाराने दत्तक घेतलेल्या गावाची अवस्था बिकट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी नीता पवार, शोभा कदम, अर्चना घारे, पूनम जाधव, माया चव्हाण, जितेंद्र पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुमित्रा दौंडकर यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरात यांनी केले. आभार शबनम खान यांनी मानले.

महागाई, महिलांवरील अत्याचार, नोटबंदी, आरक्षण, बेरोजगारी आणि विकासाची खोटी आश्वासने यावर मेळाव्यात वक्त्यांनी भर दिला. मतदान करताना घ्यावयाची काळजी आणि VVPAT बाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.