Vadgaon Maval : उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर यांचा राजीनामा ; उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांनी ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे पक्षाच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांचेकडे शुक्रवारी (दि 2) सादर केला. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपाच्या अर्चना म्हाळसकर ह्या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. आता भाजपाने त्याची परतफेड करावी अशी अपेक्षा आहे. ह्याला भाजपाचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर उपनगराध्यक्षपदाचे गणित अवलंबून आहे.

एक वर्षापूर्वी वडगाव मावळ येथील नगरपंचायतीची प्रथम सार्वत्रिक निवडणुक झाली. त्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने काही ज्येष्ठ नेते मंडळीच्या मध्यस्थीने पुढाकार घेऊन भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अपक्ष अशा 13 नगरसेवकांना एकत्रित करून दोन गट स्थापन करण्यात आले. हे दोन्ही गट एकत्र करून सत्तेची गोळाबेरीज करून उपनगराध्यक्षसह विषय समिती सभापती पदांच्या वाटाघाटी करून घेतल्या.

त्यानुसार नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्षपद भाजपाच्या वाटयाला आले होते व भाजपाने प्रथम उपनगराध्यक्ष म्हणून अर्चना म्हाळसकर यांच्या रूपाने महिलेला पहिली संधी दिली होती. उपनगराध्यक्ष म्हाळसकर यांनी ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे पक्षाच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांचेकडे शुक्रवारी (दि 2) सादर केला.

वडगाव नगरपंचायतीत सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सात, भाजपाचे सात, दोन अपक्ष आणि एक मनसे असे बलाबल आहे. दोन अपक्षांपैकी राजेंद्र कुडे हे राष्ट्रवादीला तर प्रवीण चव्हाण यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. मयूर ढोरे हे काँग्रेस पक्षाचे असून ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होऊ शकते.

राष्ट्रवादी व भाजपाकडे समसमान आठ-आठ मते आहेत. मनसे एक, तर नगराध्यक्ष मयूर ढोरे हे काँग्रेसचे असल्यामुळे दोन्ही काँग्रेसची एकत्रित मते नऊ होतात. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पारडे जड असून या पदावर राष्ट्रवादीचाच दावा असणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपाच्या अर्चना म्हाळसकर ह्या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्याबदल्यात यावेळी राष्ट्रवादीच्या गटाने उपनगराध्यक्ष पदासाठी दावा केला आहे. यावेळी भाजपाने मदतीची परतफेड करावी अशी अपेक्षा आहे. ह्याला भाजपाचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर उपनगराध्यक्षपदाचे गणित अवलंबून आहे. आता उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.