Vadgaon Maval : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मावळ आशावादी

बदलत्या राजकीय सत्तासमीकरणामुळे सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार (दि 19) मुंबई मंत्रालयात होणार आहे. मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का अशी चर्चा रंगत आहे. 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला आजपर्यंत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. तालुक्याच्या राजकीय बदलत्या सत्तासमीकरणामुळे या पदांची संधी मिळण्याची आशा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना लागून राहिलेली आहे.

जिल्हा परिषदेवर पूर्वीपासूनच एकत्रित काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व राहिले आहे. 1997 मध्ये दिवंगत दिलीप टाटीया यांना बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाले होते तर मागील पंचवार्षिकमध्ये आतिष परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती होते. जिल्हा परिषदेच्या 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा कदम, कुसुम काशीकर व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष बाबूराव वायकर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

उद्या, मंगळवारी सोडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये फारच उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंतच्या आरक्षणाचा इतिहास पाहता यावेळी खुल्या संवर्गातील महिला, अनुसूचित जमाती संवर्गातील महिला किंवा अनुसूचित जमाती संवर्ग यापैकी एका संवर्गाला आरक्षण राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शोभा कदम या सर्वसाधारण महिला संवर्गातील आहेत तर कुसुम काशीकर या अनुसूचित जमाती महिला संवर्गातील आहेत. अनुसूचित जमाती संवर्गाचे आरक्षण पडले तरी देखील त्यांचा विचार होऊ शकतो. खुल्या संवर्गाला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता जवळपास नसली तरी उपाध्यक्षपदासाठी बाबूराव वायकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

मावळ तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षापासून आमदारकी भाजपच्या ताब्यात होती, मावळ पंचायत समितीवर भाजपचेच वर्चस्व आहे. ही दोन्ही महत्त्वाची सत्ता केंद्रे मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जातीने लक्ष घालून विशेष प्रयत्न केले; परंतु पक्षातील अंतर्गत गटातटांमुळे त्यांच्या पदरी अपयशच आले.

नुकत्याच झालेल्या मावळ विधानसभेच्या निवडणुकीत 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुनील शेळके यांच्या रूपाने मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने मावळ तालुक्याला झुकते माप मिळेल, अशी आशा कार्यकर्ते बाळगून आहेत.

मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ मंगळवार (दि. 19) सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करत आहेत. मावळ तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेचे पाच सदस्य असून तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन भारतीय जनता पक्षाचे आहेत. नितीन मराठे व अलका धानिवले हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

मावळ विधानसभेचा उमेदवार निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षाने महत्वाची जबाबदारी पार पडली. मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावरच मावळ तालुक्याचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळेलअशा अपेक्षेत सर्व कार्यकर्ते आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like