Vadgaon : रमजानमध्ये मावळातील मुस्लिमांनी घरातच रोजा इफ्तार करावा : आफताब सय्यद

एमपीसी न्यूज : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मावळ तालुक्यातील मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आगामी काळात येणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व मुस्लीम बांधवांना या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.

मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण तसेच इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी. तसेच लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन सय्यद यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.