Vadgaon News : वैचारिक लेखांची राज्याकडून दखल; धोरणात्मक निर्णयासाठी उपयुक्त : प्रदीप गारटकर

पत्रकार प्रभाकर तुमकर यांच्या 'कोरोना आणि पंढरीची वारी' या लेखास उत्तेजनार्थ पारितोषिक

एमपीसीन्यूज – वैचारिक निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे लेख पुण्यातील जाणकार तज्ज्ञ परीक्षकांनी निवडले असून कोविड लॉकडाऊनच्या परिणामांना सामोरे जाताना करावयाच्या उपाययोजनांसाठी त्यातील माहितीची दखल राज्य शासनाने घेतली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आज शुक्रवारी (दि..6) येथे केले.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या वैचारिक निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गारटकर यांच्या हस्ते एकूण 60 हजार रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते. पुणे जिल्ह्यातून 850, तर मावळ तालुक्यातील 288 जणांनी स्पर्धेत भाग घेतला.

पत्रकार अमीन खान यांना तालुक्यातील प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये आणि जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ दोन हजार रुपये रोख, असे 23 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी ‘कोरोना क्रांतीचा वेध’ विषयावर लेख लिहिला होता.

द्वितीय क्रमांक ‘तिला उभारी दिली तर’च्या लेखिका शबनम खान यांना 15 हजार रुपये, तर ‘कोरोना आणि शैक्षणिक क्षेत्रासमोरील आव्हाने’ यासाठी महेश भागीवंत यांना दहा हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. प्रभाकर तुमकर यांनी ‘कोरोना आणि पंढरीची वारी’ यावर केलेल्या लेखास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.