Vadgaon News : तळेगाव- शिक्रापूर महामार्गाची दुरवस्था; 23 नोव्हेंबरला चक्का जाम आंदोलनाचा इशारा

एमपीसीन्यूज : तळेगाव-चाकण- शिक्रापूर महामार्गाच्या दुरवस्थेबाबत त्वरीत उपाययोजना न केल्यास 23 नोव्हेंबर रोजी चाकण एमआयडीसीतील एचपी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. याबाबत समितीच्यावतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची अवस्था खराब झाली आहे. कामगारांना जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. मोठमोठे जीवघेणे खड्डे पडूनही बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सतत अपघात होत आहेत.

खराब रस्त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, अग्निशमन, एसटी बस, कामगार बस आणि इतर वाहने अडकून पडतात. या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना न झाल्यास 23 नोव्हेंबर रोजी तळेगाव-चाकण महामार्गावरील चाकण एमआयडीसीतील एचपी चौकात दुपारी सव्वातीन वाजता चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे यांनी दिला आहे.

दरम्यान, निवेदन देताना सार्वजनिक बांधकाम अथवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठअधिकाऱ्यांकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.

समितीने केलेल्या प्रमुख मागण्या

रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकून डांबरीकरणाने साइडपट्ट्या भराव्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीची व्यवस्था करावी.

आवश्यक तेथे सुरक्षा कठडे, रेडियम पेंट, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिन्कर, दुभाजक बसवणे.

रस्त्यावर कमी उंचीवर लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा उंच कराव्यात. महामार्गावरील वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटाव्यात.

महामार्गाकडेला लावलेले सर्व अनधिकृत जाहिरात फलक आणि होर्डिंग्ज काढावेत.

महामार्गावरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग हटवावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.