Vadgaon News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ राष्ट्रवादीची उद्या महत्वाची बैठक

एमपीसी न्यूज – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळातील प्रमुख पदाधिकारी, विविध सेल आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक उद्या, शुक्रवारी (दि. 6) वडगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व मावळचे आमदार सुनील शेळके मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

या बैठकीला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे आदी उपस्थित राहणार आहेत.

ही बैठक शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता वडगाव मावळ येथे होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, दूध संघ, मार्केट कमिटी, विविध कार्यकारी सोसायट्या व ग्रामपंचायत निवडणुकांबाबत करावयाची पूर्वतयारी आणि आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर येत्या 1 डिसेंबर रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीबाबत आणि कोविड संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सुभाष जाधव, दीपक हुलावळे, सुनील दाभाडे व महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.