Vadgaon News : शासनाकडून शेतकऱ्यांसाठीची प्रोत्साहनपर रक्कम बँक खात्यावर त्वरित जमा करावी – भाजप किसान मोर्चा
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार रूपये प्रोत्साहनपर रक्कम मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी अशी मागणी मावळ तालुका भाजप किसान मोर्चाने केली आहे.
याबाबत मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मावळ तालुका तहसील कार्यालयात निवेदन दिले,सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी दिली.
यावेळी उपस्थितांमध्ये मावळ तालुका किसान संघ विकास शेलार, अनंता कुडे, सुनील चव्हाण, मारुती दळवी, हरिभाऊ दळवी, रामभाऊ गोणते, जालिंदर धामणकर, कचरू पारखी, आत्माराम आडकर, बाळासाहेब धामणकर, राजू असवले आदी अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा सहकारी बँकेंतर्गत विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2019 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड मार्च 2020 मध्ये बँकेच्या नियमानुसार केली आहे.
नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु अद्याप पर्यंत बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.
अडचणीच्या काळात देखील शेतकऱ्यानी सोसायटीच्या कर्जाची परतफेड करूनही शासनाने जाहीर केलेले 50 हजार रूपये खात्यावर जमा केले नाही. 31 मार्च अगोदर सदर रक्कम जमा करून शेतक-यांना दिलासा व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही केली आहे.