Vadgaon News : ‘महिंद्रा लॉजिस्टिक’च्या कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन : आमदार सुनील शेळके

महिंद्रा लॉजिस्टिक समोर कामगारांचे आंदोलन

एमपीसीन्यूज : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून महिंद्रा लॉजिस्टिकच्या कामगारांबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा सुरू आहे. पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, व्यवस्थापन यांच्या समवेत बैठक झाली. परंतु, अद्यापही कंपनीने ठोस निर्णय घेतलेला नाही. कामगार हे स्थानिक भूमिपूत्र आहेत. त्यांना कंपनीने वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाही. या कामगारांबाबत कंपनी व्यवस्थापनाने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गर्भित इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला.

कान्हे ( ता. मावळ) येथील महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीच्या 205 कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांबाबत अद्यापही ठोस निर्णय न घेतल्याने ‘महिंद्रा लॉजिस्टिक’च्या गेट समोर मंगळवारी (दि.29) कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. आमदार सुनिल शेळके यांनी कामगारांची भेट घेऊन आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

जनरल मोटर्समधील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या 205 कामगारांचे स्थलांतर करून 50 टक्के वेतन कपात केली आहे. तालुक्याच्या बाहेर नोकरी न देता स्थानिक ठिकाणी नोकरी देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. एप्रिल 2008 मध्ये जनरल मोटर्समध्ये महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी सुरू झाली होती. तेव्हापासून मावळ तालुक्यातील 205 स्थानिक भूमिपुत्र कायमस्वरूपी काम करत आहेत.

जनरल मोटर्स कंपनी डिसेंबर 2020 रोजी बंद झाल्याने या 205 कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये महिंद्रा लॉजिस्टिकच्या वतीने बैठक घेऊन कामगारांना कायमस्वरूपी पुणे जिल्ह्यात आहे त्या वेतनात नोकरी देतो, असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, 24 फेब्रुवारी रोजी महिंद्रा लॉजिस्टिकने एक वर्षाच्या मुदतीवर नव्याने नियुक्ती तसेच पूर्वीच्या पगारात 50 टक्के वेतन कमी केले. जाण्यायेण्यासाठी बसची व्यवस्था केली नाही. याच्या विरोधात कामगारांनी एप्रिल महिन्यात आंदोलन केले होते.

दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी महिंद्रा कंपनीचे तुषार टोंगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे, असे सांगितले. तसेच आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.