Vadgaon News : रस्त्यावर झाडे लावून आयआरबीचा निषेध

एमपीसीन्यूज : जांभुळ फाटा (ता. मावळ) येथील खड्डेमय व निसरडा रस्ता वारंवार अपघाताला निमंत्रण देत असल्याने रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरीकांनी ‘आयआरबी’कडे केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी खड्डेमय रस्त्यात   झाडे लावून आयआरबीचा निषेध व्यक्त केला.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत जांभुळ फाटा ते कान्हे असा आंदर मावळात जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावरुन टाकवे बुद्रुक व कान्हे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरु असते. त्यातच विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक, शेतकरी व नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकजण किरकोळ व गंभीर जखमी होत आहेत.

जांभुळ फाटा या ठिकाणी महामार्गाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यात मोठया आकाराचे खड्डे, त्यात पावसाचे पाणी साचले असुन रस्ता निसरडा झाला आहे. याठिकाणी वारंवार वाहने घसरुन अपघात होत आहेत. काहीजणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामस्थांनी वारंवार रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आयआरबीकडे केली. मात्र, आयआरबी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांनी शुक्रवारी या खड्डेमय व निसरड्या रस्त्यावर गवत लावून निषेध व्यक्त केला. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याप्रसंगी माजी सरपंच संतोष जांभुळकर, भानुदास जांभुळकर, संदीप शेडगे, मयुर जांभुळकर, प्रज्वल शेडगे, सोहम जांभुळकर, आदेश ओव्हाळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.