Vadgaon News : कान्हे फाटा-टाकवे बु- वडेश्वर रस्त्याचे काम सुरु ; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

एमपीसीन्यूज : आंदर मावळ भागातील सुमारे 40 गावांना जोडणाऱ्या कान्हे फाटा-टाकवे बु- वडेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून पाच कोटी निधी मंजूर झाला असून या कामाचा शुक्रवारी (दि 9) शुभारंभ करण्यात आला.

कान्हेचे सरपंच विजय सातकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. टाकवेचे सरपंच भूषण असवले, डाहूलीचे सरपंच नामदेव शेलार, राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, गिरीश सातकर, उपसरपंच संतु दगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, अनिल मालपोटे, प्रकाश पवार, स्वामी जगताप, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

टाकवे बु. येथील औद्योगिकरण, आंदरमावळ भागातील पर्यटन, धरणे तसेच अनेक छोट्या-मोठ्या गावांच्या संपर्कासाठी हा मुख्य रस्ता आहे. टाकवे गावांमध्ये असणार्‍या औद्योगिक वसाहतीमुळे या भागात रहदारीचे प्रमाण लक्षणीय आहे. या ठिकाणी आंदर मावळातील सुमारे 40 गावातील नागरिकांचे तसेच तळेगाव, कामशेत, वडगाव आदी भागातील कामगारांची वर्दळ असते.

_MPC_DIR_MPU_II

परंतु, हा रस्ता अरुंद असल्याने कंपन्यांमधील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सातत्याने वाहतूककोंडी व छोटे मोठे अपघातही घडत होते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक होते.

आमदार शेळके यांनी पाठपुरावा करुन निधी मंजूर करून घेतला व कामाचा शुभारंभही केला. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार असून अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातात घट होणार आहे.

कान्हे फाटा-टाकवे-वडेश्वर या 6 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे 7 मीटर इतके रुंदीकरण करण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटरच्या साईड पट्ट्या करण्यात येणार आहे. टाकवे गावात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्याठिकाणी 10 मिटर रुंद रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यातील तीन मोऱ्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.