Vadgaon News : नेवाळे यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ उद्या मावळ बंद : गणेश भेगडे

बाळासाहेब नेवाळे यांच्यावरील कारवाई राजकीय आकसातून

0

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यासाठी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर राजकीय आकसातून सत्ताधाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. विकासाचे राजकारण न करता भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असून अनेक सदस्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केला आहे. नेवाळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल  केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.24) मावळ बंदची हाक दिली असून मावळच्या जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन  भेगडे यांनी  केले आहे.

वडगाव मावळ येथील भाजप कार्यालयात मंगळवार (दि.23) आयोजित पत्रकार परिषदेत भेगडे यांनी मावळ बंदचे आवाहन केले.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र  भेगडे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक रघुवीर शेलार आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब शंकर नेवाळे यांना सोमवारी (दि.22) अटक केली जाते. गुरुवार (दि.25) पर्यंत पोलीस कोठडी दिली जाते. नेवाळे यांच्यावर एवढ्या तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे हे सर्व षडयंत्र असल्याचे दिसत आहे.

कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका बुधवार (दि.24) व गुरुवारी (दि.25) होणार असून सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करुन अन्याय सुरू केला आहे. मावळ तालुक्याचे राजकारण कधीच इतक्या खालच्या स्तराचे नव्हते. सत्ताधाऱ्यांनी विकासाचे राजकारण करावे. जनतेची दिशाभूल थांबवावी.

_MPC_DIR_MPU_II

नेवाळे यांनी 2015 ला बनावट मतदार यादी केली तर इतके दिवस का गप्प होते. नव्याने नियुक्त झालेल्या सचिवाने आता कसे ठरवले. मावळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय इतके वर्ष गप्प का होते. सव्वा वर्षाच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. नेवाळे यांना राजकीय दबावापोटी अटक केली आहे.

गोवित्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 2015 ची निवडणूक बिनविरोध झाली होती. मतदार यादी संस्थेचे सचिव तयार करतात. त्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाते, सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रत्येक संस्थेचा ऑडिट रिपोर्ट असतो. त्या ऑडिट रिपोर्टमध्ये संस्थेची सभासद यादी असते. ती तपासूनच अंतिम यादी साहाय्यक निबंधक जाहीर करत असल्याने नेवाळे यांचा यामध्ये काहीही संबंध येत नसल्याचे भेगडे यांनी सांगितले.

नेवाळे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी स्वतःच उमेदवार असल्याचे सर्वांना माहीत होते. दि.18/12/2019 ते दि.16/12/2020 पर्यंत ठराव पाठवायचे होते. त्यावेळी गोवित्री सोसायटीचे एकूण 13 संचालक होते. त्या सर्वाना रितसर मिटींगचे अजेंडा दिले. त्या 13 पैकी 9 संचालक मिटींगसाठी हजर होते.

त्या 9 संचालकांनी नेवाळे यांच्या नावाचा ठराव करुन मागील वर्षी डिसेंबर 2019 मध्ये पाठवला होता. ही नावे चुकीची की बरोबर आहे हे यादी जाहीर झाल्यानंतर लोकांना कळते, मग नेवाळे यांचे नाव बाहेर आले कसे ?, असा सवालही भेगडे यांनी उपस्थित केला.

नामदेव दाभाडे यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या बाबत नेवाळे, धडस, गायकवाड,आखाडे या सर्वानी जबाब दिले होते. तो विषय सोडून सचिव संजय ढोरे यांना फिर्याद देण्यासाठी काही संबंध नसताना भाग पाडले. ढोरे याने एक वर्षापूर्वी गोवित्रीत रात्री 9 वाजता 10 ते 15 मुले आणून धडस या सचिवाकडून चार्ज घेतला.

त्याच वेळी चेअरमन प्रकाश गायकवाड यांनी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पोलिसांनी या बाबतीत काहीच चौकशी न करता नेवाळे यांना अटक केल्याचे भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.