Vadgaon News : निवड होण्यापूर्वीच कार्यक्रम पत्रिकेवर आगामी उपनगराध्यक्षाचे नाव

वडगावमधील राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक उद्या सोमवार (दि 25) रोजी होणार आहे. परंतु प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रण पत्रिकेवर उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होण्याअगोदर प्रमिला बाफना यांचे नाव उपनगराध्यक्ष म्हणून टाकण्यात आले आहे. निवडणूक होण्याअगोदर नावापुढे उपनगराध्यक्षपद टाकल्याने वडगाव मावळातील राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाची (26 जानेवारी) कार्यक्रम पत्रिका दि 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली सदर कार्यक्रम पत्रिकेत वडगांव नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम उद्या सोमवार (दि 25) होणार असून सदर निमंत्रण पत्रिकेत प्रमिला राजेश बाफना यांची निवड होण्यापूर्वीच उपनगराध्यक्ष असा उल्लेख करुन कायद्याची पायमल्ली केलेली आहे.

या पत्रिकेत उपनगराध्यक्ष चन्द्रजित वाघमारे व मुख्य अधिकारी सुवर्णा ओगले यांचा उल्लेख होणे अपेक्षित होते परंतु नगरपंचायतच्या मनमानी कारभाराचा वडगाव शहर भाजपने जाहीर निषेध केला आहे.

दरम्यान या निमंत्रण पत्रिकेचे वाटप वडगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. या निमंत्रण पत्रिकेवर मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांचे नाव नसतानाही शासकीय पातळीवर पत्रिका वाटण्याचा घाट घातला जात आहे.

दरम्यान नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याशी बोलणे झाले असता ते म्हणाले ही निमंत्रण पत्रिका अधिकृत नसून ती ग्रामस्थांनी छापली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी न वाटता ती आमच्या कार्यकर्त्यांमार्फत वाटण्यात आली आहे.

नगर पंचायतीतील दोन गटाचा निर्णय झाला असून प्रमिला राजेंद्र बाफना या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीत आमचे बहुमत असल्याने तशी अडचण येणार नसल्याने ग्रामस्थांनी पत्रिकेवर नाव टाकले आहे.

मुख्याधिकारी ओगले यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.