Vadgaon News : जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर व्यापारी संकुल उभारणार; 4 कोटी 81 लाख रूपयांचा निधी मंजूर 

निधी मंजूरीसाठी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांचे विशेष प्रयत्न

एमपीसी न्यूज – मुख्य बाजारपेठेतील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या (चाफ्याची शाळा) जागेवर चार मजली व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी 4 कोटी 81 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांनी दिली आहे.  

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या विशेष प्रयत्नातून या व्यापारी संकुलासाठी जवळपास पाच कोटी निधी मंजूर झाला आहे.

या व्यापारी संकुलामध्ये पार्किंग, तळमजल्यावर शाॅपींग गाळे, पहिल्या मजल्यावर शाॅपींग गाळे, दुस-या मजल्यावर शाॅपींग गाळे व वाचनालय, तिस-या मजल्यावर सांस्कृतिक भवन, रूम आणि चौथ्या मजल्यावर राखीव हाॅल व रूम त्याचबरोबर दोन लिफ्ट, स्वच्छतागृह अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

बाजारपेठेत चार गुंठे जागेत स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली जिल्हा परिषदेची जुनी शाळा अर्थात चाफ्याची शाळा अशी जुनी ओळख असलेली शाळा, अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वापरासाठी बंद करण्यात आली आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही इमारत पाडून जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे साधन व्हावे, हा मानस बाळगून त्याठिकाणी भव्य दिव्य व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव मागील वर्षी बाबुराव वायकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम समितीकडे दिला होता.

त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने सध्याची इमारत धोकादायक असल्याचा व इमारत पाडण्यास हरकत नसल्याचा दाखला दिला आहे.

या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 4 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर केला असून या संकुलाची मालकी जिल्हा परिषदेकडेच राहणार आहे. लवकरच या संकुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

शहरातील हे पहिलेच भव्य दिव्य व्यापारी संकुल
तालुक्याची राजधानी समजल्या जाणा-या वडगाव शहरातील हे पहिलेच भव्य दिव्य चार मजली व्यापारी संकुल ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळेलच परंतु छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.