Vadgaon News  : ‘कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’

मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी राज्यातील पत्रकार व पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मावळच्या तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

शासनाने माध्यमांना लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून वार्तांकनाची तसेच माध्यमातील इतर सर्व कामांना परवानगी दिली होती. पत्रकार देखील कोरोना योद्धे आहेत.

पत्रकारांना प्रत्यक्ष समाजात जाऊन वार्तांकन करावे लागते. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अनेक पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे.

या पार्श्वभूमीवर  आज शुक्रवार (दि 18) राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतिने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे तसेच कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाना शासनाने त्वरीत मदत करावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन मावळ तालुक्यातही दुपारी 12 वाजता करण्यात आले. मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतिने मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, सचिव भारत काळे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे, बाळासाहेब भालेकर, एमपीसी न्यूजचे प्रभाकर तुमकर, सचिन शिंदे, महादेव वाघमारे, निलेश ठाकर, संकेत जगताप, पत्रकार सेवा संघाचे तुषार वहिले, लोकमतचे सचिन ठाकर, नामदेव घरदाळे आदी उपस्थित होते.

तसेच या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.