Vadgaon News : परिवर्तनाची सुरवात स्वतःपासून करा – भास्करराव पेरे पाटील

एमपीसी न्यूज – प्रत्येकाने प्रत्येक परिवर्तनाची सुरुवात स्वतापासून करावी, असा कानमंत्र पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी दिला. मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगावचे उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, सरस्वती व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक भालेराव, माजी उपसभापती शांताराम कदम, नामदेव भसे, विठ्ठलराव घारे, कार्याध्यक्ष अश्विनी बवरे, कार्यक्रम प्रमुख संगीता ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अनेकता मे एकता असली की अनेक असाध्य विकासकामे सिद्धीस जातात. पाटोदा गावांत ४ प्रकारचे पाणी, मोठ्या प्रमाणात केलेले वृक्षारोपण, स्मशानभूमी, सायकल वाटप, सौरऊर्जा प्रकल्प , गांव भोजन , १०० टक्के वैयक्तिक स्वच्छतागृह अभियान , थुंकण्यासाठी केलेले वॉश बेसीन्स , कचऱ्याचे नियोजन , सीसीटीव्ही यंत्रणा, बायोमेट्रिक हजेरी , डिजीटल शाळा , पाण्याचे सर्व प्रकारचे नियोजन , सामुदायिक विवाह , वैयक्तिक वाढदिवस साजरा करणे , तंटामुक्त गांव , कपडे धुण्यासाठी धोबी घाट, निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेते गांव असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आलेले आहेत याचे मुख्य कारण ‘सूत्र’ आहे, असे पेरे पाटील म्हणाले.

बाळ जन्माला आले तर आधी त्याला ऑक्सिजन लागतो आणि तो निसर्ग संवर्धनातून मिळतो, असेही ते म्हणाले. अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्नोत्तरे सदरात सहभाग घेतला. ऑनलाईनच्या माध्यमातून हजारो नागरिक या व्याख्यानांचा आनंद घेत आहेत.

अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. अतुल म्हाळसकर यांनी मानपत्र वाचन केले.  अमोल ठोंबरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.