Vadgaon News : वडगाव नगरपंचायत वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत 6 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण  

वडगावसह कार्ला, वराळे, नवलाख उंब्रे या गावांमध्येही नागरिकांची तपासणी

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतच्या वतीने बुधवारी (दि 23)  लाॅकडाऊन करून राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत सहा हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात जवळपास पंचवीस हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वडगावकरांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या सुचनांनुसार बुधवारी वडगावात ही मोहीम राबविण्यात आली. नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, आरोग्य सभापती राजेंद्र कुडे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली.

सकाळी साडेसात वाजल्यापासून नागरिकांची घरोघरी जाऊन तपासण्या करण्यास सुरुवात झाली. यामध्ये थर्मलगनद्वारे तापमान तपासणे, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासणे, काही लक्षणे असल्यास अँटीजेन टेस्ट, जास्त लक्षणे असल्यास स्वॅब टेस्ट अशा विविध प्रकारे तपासण्या करण्यात आल्या.

कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या चाळीस नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली यांपैकी आठ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तळेगाव दाभाडे येथील कोव्हिड केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. अशी माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

या मोहिमेसाठी समारे 145 आरोग्य सेवकांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक, नगरपंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

तसेच या मोहिमेत शहरातील डाॅ. दिनेश दाते, डाॅ. गौरव धंदुके, डाॅ. ज्योती बुतडा यांचे विशेष मोलाचे सहकार्य मिळाले.

_MPC_DIR_MPU_II

शहरात दिवसभर सर्वेक्षण सुरू असताना तहसिलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वयक अधिकारी उमेश बागडे आदींनी भेट दिली.  शहरात दिवसभर लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनीही आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मावळ तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत बुधवारी कार्ला येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कार्ला गावातील 498 कुटुंबातील 2 हजार 324 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच संशयित 55 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आमदार सुनील शेळके, मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के व मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मावळात सुरू आहे. त्या अंतर्गत बुधवारी कामशेत, कार्ला, वराळे, नवलाख उंब्रे या गावामध्ये ही मोहीम राबविण्यात आली.

नवलाख उंब्रे येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत झोनमधील एकूण कुटुंब संख्या 1334 तपासणी झालेल्या नागरिकांची संख्या 6318 असून संशयित रुग्ण 24 जणांची अँटीजेन तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एक ही पाॅझिटिव्ह रूग्ण आढळला नाही.

वराळे येथील संपूर्ण गावात तपासणी करण्यात आली. शिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका ग्रामसेवक असे 120 जणांचे पथक 60 टीम तयार केल्या होत्या. संपूर्ण गावामध्ये ऑक्सिमीटर टेस्टिंग व थर्मलगनद्वारे 4500 जणांची तपासणी करण्यात आली. आणि इतर लक्षणे असणा-यांना पुढे हाॅस्पिटलमध्ये जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, गटविकासाधिकारी वाजे, विस्तार अधिकारी कारंडे, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.