Vadgaon News :  बेवारस टँकरमुळे वाढतेय घाणीचे साम्राज्य; दुर्गंधीने नागरिक हैराण

एमपीसीन्यूज : एक गॅस टँकर अनेक वर्षांपासून एका महाविद्यालयाजवळ धूळखात उभा आहे. त्यामुळे तिथे कचऱ्याचे ढीग साचले असून या जागेचा उपयोग आता स्वच्छतागृह म्हणून होऊ लागला आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ज्या ठिकाणी हा टँकर उभा आहे. तिथे श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयात आहे. टँकरच्या आजूबाजूला साचलेला कचरा आणि दारूच्या बाटल्यांमुळे परिसराला बकालपणा आला आहे. दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.

शिवाय स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे उंदीर आणि घुशींचा वावरही वाढला आहे. त्यात अलीकडे विषारी सापही येथे पाहायला मिळाल्याचे नागरिक सांगतात.

वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हा टँकर पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. तेव्हापासून तो तिथे उभा करुन ठेवण्यात आला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

धुळखात उभा असलेला हा गॅस टँकर बाजूला करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश भुरुक, सोमा भेगडे, आशिष खांडगे, शरद मोरे, हरीश दानवे आदींनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.