vadgaon : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेळेत चाप लावा – सायली म्हाळसकर

Put an end to the rising crime in the city in time - Sayali Mhalaskar

एमपीसीन्यूज – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला वेळेत चाप लावण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सायली रूपेश म्हाळसकर व वडगाव शहर मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन वडगावचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आज, शनिवारी देण्यात आले.

मावळ तालुक्यात तालुक्यात शांतता प्रिय व सांस्कृतिक वारसा जपणारे, ऐतिहासिक शहर म्हणून वडगावची पूर्वी पासून ओळख आहे पण मागील २ – ३ वर्षामध्ये शांत समजले जाणारे वडगाव शहराचे नाव काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे व गुन्हेगारांमुळे हळू – हळू पुसले जाऊ लागले आहे.

सध्या शहरात दहशत पसरवीने, कमी वेळात पैसा किंवा नाव कमविण्याच्या हेतूने अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या छोट्या – मोठ्या टोळ्या, गुन्हेगार उदयास येऊन डोकं वर काढू लागल्या आहेत. तसेच त्यांचा वावरही सर्रासपणे शहरात वाढला आहे. यामुळे शहरातील सर्व सामान्य नागरिक भीती – दहशतीचे वातावरणात दबून गेला आहे.

आजपर्यंत गावची शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यात पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यशस्वी ठरले आहेत. आता मात्र बाहेर गावातून स्थलांतरित होऊन शहरात आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तरुणांची व गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस शहरात झपाट्याने वाढू लागली आहे. ती डोकेदुखी ठरत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सध्याच्या गुन्ह्याची नोंद लक्षात घेता काही गंभीर गुन्ह्याची उकल झाली असता त्या गुन्ह्यामध्ये शहरातील तरूण गुन्हेगारांचा सहभाग प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दिसून आलेला आहे.

किरकोळ वादांचे रूपांतर टोळी युद्धापासून जीवितहानी होईपर्यंत पोहोचत आहे. सदर घटनांचे गांभीर्य लक्षात घेता वेळीच गुन्हेगारी टोळ्यांचा व गुन्हेगारांचा बिमोड करून वाढत्या गुन्हेगारीवर चाप लावणे गरजेचे बनले आहे. अन्यथा तसे न झाल्यास पोलिसी खाकीचा गुन्हेगारांच्या मनात थोडा ही धाक व जरब शिल्लक राहणार नाही. यामुळे शहरात अशांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती चिंताजनक होऊ शकते.

यामुळे शांतता प्रिय असलेले वडगाव शहर गुन्हेगारांचे अड्डा म्हणून भविष्यात नावारुपास येऊ शकते, अशी भीती मनसे नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

यावेळी मावळ मनसेचे प्रसिद्धीप्रमुख तानाजी तोडकर, विकास साबळे, ओंकार भांगरे व अजय देडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.