Vadgaon : वाढती गर्दी आणि डेंग्यू सदृश्य ताप प्रतिबंधासाठी उपाययोजना करा : भाजपची मागणी

वडगाव मावळ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगांव शहरामध्ये नागरिकांची वाढती गर्दी आणि डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ याबाबत वेळीच दक्षता घेऊन प्रतिबंधासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी भाजपच्या वतीने वडगांव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी १७ मे २०२० पर्यंत लॉक डाऊन घोषित केला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सामाजिक अंतर ठेवण्याचे तसेच चेहेऱ्याला मास्क अथवा रुमाल वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.

मात्र, वडगांव शहरात सर्व ठिकाणी दररोज मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी होतांना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिक योग्य ती काळजी देखील घेतांना दिसून येत नाहीत. याला आळा घालण्यासाठी वेळप्रसंगी पोलीस दलाची देखील मदत घेण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर वडगांव शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश्य तसेच इतर तापासारख्या आजाराचे रुग्ण देखील वाढत असल्याने नगरपंचायत यांच्या मार्फत तातडीने सर्वत्र जंतुनाशक फवारणी व इतर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे,माजी उपनगराध्यक्षा व नगरसेविका अर्चना म्हाळसकर,अॅड.विजय जाधव, प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.