Vadgaon : नगरपंचायत इमारतीचे बांधकाम सौंदर्यदृष्टी व दूरदृष्टी ठेऊन करावे – सायली म्हाळसकर

नगरपंचायतीची नियोजित वास्तू ही तितकीच दर्जेदार आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना असावी ; The construction of the building planned by the Nagar Panchayat should be done with aesthetics and foresight - Sayali Mhalaskar

एमपीसीन्यूज : सध्या आपण आधुनिक तसेच डिजिटलायझेशन युगात वावरत असून भारतात विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहेत. याच धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरी व ग्रामीण भारताचा विकासाचा पाया रचला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्याची राजधानी असणाऱ्या व राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या नियोजित इमारतीचे बांधकाम सौंदर्यदृष्टी व दूरदृष्टी ठेऊन करावे, अशी मागणी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी सुचिता पानसरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका म्हाळस्कर यांनी वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या उर्वरित इमारतीचा विकास साधण्यासबाबत आज, मंगळवारी मुख्याधिकारी पानसरे यांच्यासह नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे कि, नुकताच राज्यशासनाच्या वतीने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वडगाव नगरपंचायतीच्या उर्वरित इमारत बाधकांसाठी मुबलक निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुक्याच्या राजकारणात वडगाव शहराने नेहमीच आपली महत्वाची भूमिका बजावली असून आपल्या कार्याचा ठसाही जनमाणसावर बिंबवला आहे. तसेच गावातील राजकारण व समाजकारणाला दिशा देऊन जनतेपुढे एक आदर्श निर्माण करून लक्ष वेधून घेण्याचे काम वडगावने केले आहे.

म्हणून नव्याने उभारण्यात येणाऱ्या वडगाव नगरपंचायतीची नियोजित वास्तू ही तितकीच दर्जेदार आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना असावी असं प्रत्येक वडगावकर नागरिकांना वाटत आहे.

कोणतीही वास्तू निर्माण करतांना त्यामध्ये दूरदृष्टी व सौंदर्यदृष्टीची सांगड हवीच. जर दूरदृष्टीला रचनेची जोड असेल, तरच तो विकास चिरंतन काळ टिकतो. त्याचप्रमाणे रचना तेव्हाच सुंदर होते जेव्हा त्याच्यात सौदर्य दृष्टी असेल.

इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील आराखडा, कल्पना, विचार येथे साकार झाले पाहिजेत. कारण पुढील अनेक वर्षांचा गावगाडा व गावकारभार येथूनच हाकला जाणार आहे. तसेच शहराच्या विकासाचे व प्रगतीचे नियोजन याच पवित्र मंदिरातून होणार आहे.

सर्वांना अभिप्रेत असे आखीव व रेखीव इमारतीचे बांधकाम हे नक्कीच शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे असेल. भविष्यातील किमान 50 वर्षांच्या नियोजनाचे प्रतिबिंब या ठिकाणी साकारले पाहिजे.याच दृष्टीकोनातून सूचना व संकल्पना या पत्रातून मांडण्यात आल्या आहेत.

नियोजित बांधकाम आराखड्यात सविस्तरपणे त्याचा समावेश करण्याचे पत्र नगरसेविका म्हाळस्कर यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केले.

निवेदनातील समावेशक सूचना व प्रस्ताव पुढीलप्रमाणे

• नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सी.इ.ओ, विषय समिती सभापती, विरोधी पक्षनेते, गटनेते यांची स्वतंत्र दालने असावीत.

• पत्रकारांना पत्रकार कक्ष व पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स हॉल असावा.

• भव्य मुख्य सभागृह आणि सर्वांना सभागृहाचे कामकाज पाहता येईल अशी प्रेक्षक गॅलरी असावी.

• नागरिकांसाठी प्रतिक्षालय,वाचनालय किंवा ग्रंथालय तसेच आपत्कालीन नियंत्रण व तक्रार निवारण कक्ष,कॅन्टीन असावे.

• रेनवाटर हार्वेस्टिंग सिस्टीम त्याचबरोबर सौरऊर्जा (सोलर) सिस्टीम ,अग्निशामक यंत्रणा बसविण्यात याव्यात.

• मुख्य रस्त्यावर सर्वांचे दृष्टीस पडेल असे दिमाखदार व सुशोभित प्रवेशद्वार असावे. दोन्ही बाजूस नागरिकांसाठी फूटपाथ असावेत तसेच सुसज्ज पार्किंग व्यवस्था असावी.

• इमारतीच्या समोरच मध्यभागी जास्तीत जास्त उंचीचा राष्ट्रीय ध्वजस्तंभ असावा म्हणजे तो शहराचा आकर्षण बिंदू ठरेल.

• इमारतीच्या तळमजल्यावर मध्यस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आकर्षक स्मारक असावे व त्यासमोर पुरेसी जागा असावी.

• इमारतीत सर्व मजल्यावर जाण्यासाठी उद्ववाहक (लिफ्ट) व्यवस्था तसेच अपंग, विकलांग व वृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअर रॅम्प असावा.

• कामगारांच्या कल्याणार्थ कामगार पतपेढी असावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी चेंजीग रूम व लॉकरस् असावे.

• स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह प्रत्येक मजल्यावर असावीत.

या सर्वसाधारण बाबीचा समावेश जर आराखड्यात असेल तर पुढील अनेक वर्षे मुख्य इमारतीच्या बांधकामात बदल करावा लागणार नाही, असा ठाम विश्वास ही यावेळी सायली म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी यांच्याशी बोलतांना व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.