Vadgaon : तरुणांची ‘माणुसकी’; पायी गावी निघालेल्या मजूर कुटुंबांना पाणी, फळ वाटप

एमपीसी न्यूज – हाताला काम नाही, खायला अन्न नाही, गाढवांना खायला चारा नाही, अशा अवस्थेत सापडल्याने शेवटी गाढवांसह गावाकडे पायी निघालेल्या मजुरांची अवस्था पाहून युवा उद्योजक सिद्धेश ढोरे यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नगराध्यक्ष मयुर ढोरे मित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांना केळी, टरबूज व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

वेहेरगाव येथील एकवीरा देवीच्या गडाच्या पायऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी श्रीगोंदा (अहमदनगर) येथून वडार समाजाची ८ कुटुंबे आपल्या गाढवांच्या लवाजम्यासह आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने या कुटुंबाच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

तसेच त्यांच्या गाढवांना चाराही उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे कुटुंबासह गाढवांची परवड सहन न झाल्याने ते कुटुंब गाढवावर संसार लादून पायी चालत घराच्या दिशेने निघाले.

वडगाव मावळ येथून मुंबई- पुणे महामार्गाने पायी चालत जात असताना त्यांना उद्योजक सिध्देश ढोरे यांनी पाहिले. चौकशी केली तेव्हा त्यांची झालेली परवड निदर्शनास आली. नगराध्यक्ष मयुर ढोरे मित्र परिवाराच्या वतीने सिद्धेश ढोरे, यशवंत शिंदे, प्रदीप पटेकर,बाबू कडू, कार्तिक यादव आदींनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीतून त्या कुटुंबांना गुरुवारी (दि.१६) सकाळी १०:३० वाजता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, केळी व टरबूज वाटप केले.

या कुटुंबासोबत लहान मुले, बायका, गाढव व कुत्रे असल्याने त्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच खुबा राठोड व किसन चव्हाण हे मजूर उपाशीपोटी कल्याण येथून पायी चालत कर्नाटक येथे निघाले होते. त्या कुटुंबासोबतच या मजुरांनाही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, केळी व टरबूज वाटप केले.

या कुटुंबांना यावेळी ख-या माणुसकीचे दर्शन घडले. ही मदत लाख मोलाची असल्याची भावना व्यक्त करून आभार मानत मजूर कुटुंब मार्गस्थ झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.