Vadgaon : पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मजुरावर उपासमारीची वेळ; नगराध्यक्षांनी दिला मदतीचा हात

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील चन्नाप्पा अर्जुन कुऱ्हाडे या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीत रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या कुटूंबाला पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे चक्क पांढरी शिधापत्रिका देण्यात आली आहे. मात्र, या कुटुंबाची अडचण जाणून घेत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांना वीस दिवस पुरेल इतके किराणा साहित्य दिले.

कुऱ्हाडे यांच्या घरांमध्ये एकूण चार सदस्य असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हे कुटुंब वडगाव शहरातील विशाल लाॅन्स या भागात गेल्या वीस वर्षांपासून वास्तव्यास आहे. आश्चर्य म्हणजे ह्या व्यक्तीस अन्न पुरवठा विभागाने २००६ साली पांढरे रेशनकार्ड देऊन त्यांना उच्चस्तरीय कुटुंबांच्या यादीतच बसवले आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात या कुटुंबाला आपले हक्काचे धान्य मिळत नाही. दुसरीकडे कामधंदा नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती मिळताच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी पुरवठा विभागाने पांढरी शिधापत्रिका दिल्याने रेशनवर हक्काचे धान्य मिळत नसल्याची माहिती कुऱ्हाडे यांनी ढोरे यांना दिली. त्यावर ढोरे यांनी त्यांना वीस दिवस पुरेल इतके किराणा साहित्य दिले. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर शिधापत्रिकेची चूक दुरुस्त करून देण्याचे आश्वासन ढोरे यांनी त्यांना दिले.

पांढरे रेशनकार्ड कोणाला मिळते

ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल किंवा त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून चार हेक्टरपेक्षा जास्त बारमाही शेतजमीन, असेल अशा कुटुंबांना पांढरी शिधापत्रिका देण्यात येते.

मात्र, कुऱ्हाडे यांच्याकडे कोणतीही गाडी, बंगला, एक, दोन एकर जागा नाही किंवा वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा मोठे नाही. याउलट ते ब-याच वर्षांपासून मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत आहेत. ते आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन खूप दिवसांपासून शासनाचे उबंरठे न्याय हक्कासाठी झिजवत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी कायमच निराशा पडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.