Vadgaon : मावळात आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण सक्रिय रुग्ण संख्या 69

Three more patients in Maval corona positive; Total active patient number 69 :मावळात आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण सक्रिय रुग्ण संख्या 69

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील दोन व कामशेत येथील एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण सक्रिय रुग्ण संख्या 69 वर पोहोचल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक 5 मधील 48 वर्षीय व्यक्ती वैयक्तिक कामाकरिता दि. 20 रोजी कल्याण (मुंबई) येथे गेली होती. तेथे एक दिवस मुक्काम करून ही व्यक्ती पुन्हा तळेगाव येथे परतली. दि. 23 रोजी या व्यक्तीला ताप आला होता.

त्यानंतर तपासणीसाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. 1 तारखेला या रुग्णाचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज, शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला.

दरम्यान,या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील एक जणाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी सांगितले.

तसेच तळेगाव दाभाडे येथील रिनो काॅलनीतील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. म्हणून त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून तळेगाव जनरल हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

दि. 30 जून रोजी खाजगी लॅबमध्ये स्वॅब घेतला होता. काल (दि 2) रात्री त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. या व्यक्तीला तळेगाव जनरल हाॅस्पिटल येथे दाखल आहे. त्यांच्या निकटच्या संपर्कातील तीन व्यक्ती आहेत.

कामशेत येथील दत्त काॅलनी मधील 61 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने 2 तारखेला त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज, शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला.

दि.16 रोजी या व्यक्तीची एका खाजगी रूग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर बरे होऊन ते घरी गेले होते. चार दिवसापूर्वी ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. ते सध्या जनरल हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

मावळ तालुक्यात 44 रुग्णांची कोरोनावर मात

मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण- 118 (शहरी- 49 व ग्रामीण-69) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 44 जणांनी कोरोनावर मात केली असून आता तालुक्यात कोरोनाचे 67 सक्रिय रुग्ण आहेत, असे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

मावळात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी यांनी केले आहे.

तळेगावात कोरोनाचे 27 सक्रिय रुग्ण

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत 41 जणांना कोरोनाची लागण झाली असून पैकी 13 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून आज एक रुग्ण सापडल्याने सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व डाॅ प्रवीण कानडे यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.