Maval News : शैक्षणिक कार्यात दारूंब्रे ग्रामस्थांचे, पालकांचे मोलाचे सहकार्य- मुख्याध्यापक नारायण पवार

सेवानिवृत्तीनिमित्त पवार यांचा मावळ मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज – शासकीय नोकरीत एकाच ठिकाणी तब्बल 31 वर्ष सेवा देण्याचे मला मोठे भाग्य लाभले आहे. दारूंब्रे गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्यापासून आणि इमारतीसाठी जागा मिळविणे, इमारत उभी करणे अशी आव्हाने ग्रामस्थांच्या सहकार्याने लिलया पेलली. या प्रवासात दारूंब्रे ग्रामस्थांचे, पालकांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे, त्यांचा मी कायम ऋणी राहिल, अशा भावना वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संचलित दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण दादू पवार यांनी व्यक्त केल्या.

पवार 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  मावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मुख्याध्यापक पवार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच कामशेत येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते.

याप्रसंगी मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, विश्वस्त बबनराव भसे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब उभे, सौ. रेखा परदेशी, मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब माळशिकारे, अरगडे सर, विकास तारे, उद्धव होळकर, राजेंद्र लासुरकर, कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य अदिनाथ उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक नारायण पवार पुढे बोलताना म्हणाले,”  1991 मध्ये वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संचलित दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलमध्ये सह शिक्षक म्हणून मी रुजू झालो. मात्र, दारूंब्रे गावात माध्यमिक शाळा सुरू करण्यापासून शाळेसाठी जागा मिळविणे, इमारत उभारणी करणे अशी आव्हाने समोर होती.

मात्र, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि दारूंब्रे गावचे तत्कालीन सरपंच कै. आत्माराम बापू वाघोले यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली 1 एकर जागा मिळाली. या जागेत शाळा उभारली. आता 6 वर्ग खोल्या आहेत. यामध्ये 8 ते 10 पर्यंत शिक्षण सुरू आहे. शासनाच्या आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळेत अद्यावत अशी 10 कॉम्प्युटरची लॅब उभारण्यात आली आहे. शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी प्रसन्न वाटावे म्हणून झाडे लावण्यात आली आहेत.”

तसेच संस्थेचे मानद सचिव ऍड. बाळासाहेब पाटील, सह सचिव धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विविध चांगले उपक्रम राबविले असल्याचे मुख्याध्यापक नारायण पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.