Pimple Gurav : वनविभागातर्फे ऐन पावसाळ्यात शाळेवर कारवाईची नोटीस

आनंदग्राम मधील साडेतीनशे विद्यार्थ्यांचे स्थलांतर करायचे कुठे ? 
 

एमपीसी न्यूज –   वनविभागाने डुडुळगाव येथील आनंदग्राम सोसायटीला अचानक जागा खाली करण्याचे आदेश दिल्याने सोसायटीमधील रुग्णालयातील कुष्ठरोगी आणि सोसायटीचेच जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील तब्बल साडेतीनशे विद्यार्थ्यांचे स्थलांतर करायचे कुठे ? असा प्रश्न आनंद ग्राम संस्थेपुढे उभा ठाकला आहे.

आळंदी जवळील डुडुळगाव येथील वनविभागाच्या राखीव वन सर्वे नं. 11 (गट नं 78) येथील वनक्षेत्रावर 1965 पासून आनंदग्राम सोसायटी उभी आहे. तसेच 1971 पासून संस्थेने कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरु केली आहे. सध्या या शाळेत साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने येत्या 8 ऑगस्टपूर्वी वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवावे असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वनविभागाने आनंदग्राम संस्थेला जागा खाली करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, अचानक नोटीस पाठवण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात येथील 11 कुष्ठरुग्ण आणि जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिकत असलेल्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करायचे कुठे ? असा गहन प्रशन संस्थेपुढे आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी नोटीस पाठवली असती, तर विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करता आले असते. पण आता ऐन पावसाळ्यात एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करायचे कुठे, याची चिंता संस्थेपुढे आहे. त्यामुळे वनविभागाने किमान पावसाळा संपेपर्यंत तरी कारवाई करू नये, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.