Pune News: 12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन; लॉकडाऊनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार

Vanchit Bahujan Aghadhi protest against lockdown on 12th august राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे.

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

या बससेवा तत्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इत्यादी संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय.

या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.