Pimpri: प्रकाश आंबेडकर, असुदोद्दीन ओवेसी यांच्या सोमवारी धडाडणार तोफा

वंचित बहुजन आघाडीचे सोमवारी पिंपरीत महाअधिवेशन : अध्यक्ष देवेंद्र तायडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – ‘वंचित बहुजन आघाडी’चे येत्या सोमवारी (दि.28) पिंपरीत महाअधिवेशन होणार आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष असुदोद्दीन ओवेसी यामध्ये मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. 28 जानेवारी 2019) दुपारी 3 वाजता पिंपरी नेहरुनगर येथील एच. ए. ग्राऊंड येथे भव्य सभा आणि महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आंबेडकर, ओवेसी यांच्यासह आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे उपस्थित राहणार आहे.

या सभेला राज्यभरातून विशेषता पश्चिम महाराष्टातून 2 लाख जनसमुदाय येणार आहेत. त्यादृष्टीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका सुरु आहेत. प्रचार पत्रके, हॅण्डबील, सोशल मिडीया, बॅनर, होर्डीग्जच्या माध्यमातून प्रचार, प्रसार सुरु आहे.

जातीयवादी भाजपा-शिवसेना सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी, वंचित बहुजनांच्या हाती सत्तेची चावी देण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाव्दारे बहुजनांना दिलेले अधिकार मिळवून देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘वंचित बहुजन आघाडी’ एकत्र आली आहे.

वंचित बहुजन आघाडी मध्ये भारिप बहुजन महासंघ, एमआयएमबरोबरच धनगर समाज, माळी समाज, मातंग समाज, लिंगायत समाज, होलार समाज, भटका विमुक्त समाज, बंजारा समाज आदी समाजांसह अनेक समाज संघटना, संस्था कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वंचित बहुजन समाज सत्ता परिवर्तन घडवेल, असा विश्वासही तायडे यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला अकील मुजावर, नाथन केंगार, सुरेश गायकवाड, रहीम सैय्यद, सचिन तराळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.