Pune : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भिंतींवर केलेल्या रंगरंगोटीमुळे विद्रुपीकरण – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भिंतींवर केलेल्या रंगरंगोटीमुळे विद्रुपीकरण होत असल्याचे पत्र राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेले ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण देशात सर्वत्र राबविले जात आहे. पुणे शहराला या सर्वेक्षणात नंबर मिळवा यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असला तरी ‘स्वच्छ भारत’ या अभिनाच्या मूळ उदेशालाच हरताळ फासण्याचे काम राजरोसपणे चालू असल्याचे निराशाजन्य दृश्य शहरात बघायला मिळत आहे.

या सर्वेक्षणांतर्गत पुण्यातील सार्वजनिक भिंती, धार्मिक स्थळे, उद्याने, ऐतिहासिक वास्तू आदी ठिकाणांच्या भिंती रंगवल्या जात आहे. हे रंगवत असताना कुठल्याही स्वरूपाचे नियम, माहिती आणि आराखडा संबधित ठेकेदाराला न दिल्यामुळे अतिशय वाईट स्वरुपात या भितीं दिसत आहेत.

त्याच्या काही नोंदी खालीलप्रमाणे –

१) थोर व्यक्ती, संत, युगपुरुष, समाजसुधारक, शहीद जवान यांची चित्रे भिंतीवर वेडीवाकडी रेखाटली गेली आहेत. त्यांच्या जागा योग्य ठिकाणी नसल्यामुळे ही चित्रे चिखल, थुंकण्यामुळे वाईट अवस्थेत बघायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमुळे या थोर व्यक्तींचा अवमान होत आहे.

२) जी स्थळे अथवा जागा रंगरंगोटी साठी निवडली आहेत, त्या भिंतीचे स्वरूप याचा अभ्यास केला गेलेला नाही. दगडी भिंतीवर देखील रंगरंगोटी केली गेली असल्यामुळे त्या भिंतीच्या मूळ सुंदरतेलाच धक्का लागला आहे.

३) अनेक ठिकाणी मोठमोठ्या अक्षरांत स्थानिक नगरसेवकांची नावे व क्षेत्रीय कर्यलायांची नावे लिहिली आहे.

४) भारतीय जनता पार्टीचे असलेले चिन्ह अनेक भिंतीवर रेखाटलेली आहेत.

५) जागा, परिसर यांचा विचार न करता केवळ ठराविक माप पूर्ण करण्याच्या नादात अतिशय वाईट काम अनेक ठिकाणी झालेले आहे.

६) रस्त्याच्या बाजूला दगडी कंपाऊंड, भिंती येथे पुन्हा पुन्हा हलक्या प्रतीचे रंग वापरल्याचे काही जागरूक लोकांनी निदर्शनास आणून दिले. ही कर दात्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे.

७) ज्या स्वरुपाची चित्रे रेखाटली गेली आहेत, ती देखील मनाला भावणारी नाहीत, अशी टीका सामान्य नागरिकांपासून ते प्रतिष्टीत कलाकारांमार्फत केली जाते.

भारतीय राज्यघटनेच्या ७२ व ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार १२ व्या शेड़युलनुसार शहरांच्या ‘अस्थेटीक’ बाबत नमूद केलेले आहे. परंतु, या गोष्टीकडे देखील दुर्लक्ष होत आहे.

हे चित्र बदलण्यासाठी खालील काही गोष्टींची पूर्तता करावी –

१) पुण्यात अनेक कलाकार आहेत ज्यांना पुण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, अश्या संबधित व्यक्तींची एक कमिटी महापालीकेद्वारा नेमण्याची विनंती मी वारंवार करत आहे, पण आजतागायत अशी कमिटी स्थापन झालेली नाही. आपल्याला विनंती आहे की, आपण लवकरात लवकर ही कमिटी स्थापन करावी जेणेकरून आपले पुणे सुंदर दिसण्यास मदत होईल.

२) पुण्यात ६ चित्रकला महाविद्यालये आहेत. दरवर्षी एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात या मुलांची मदत घेऊन हे काम आपण पूर्ण करू शकतो.

३) जयपूर व अन्य काही शहरांमध्ये भिंती रंगवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा केल्याचे समजते, त्यामूळे तेथील रंगवलेला परिसर सुंदर दिसत आहे. परंतु, पुण्यात अश्या नियोजनांचा अभाव दिसतो, त्यामुळे अश्या स्वरूपातील आराखडा तयार करणे गरजेचे आहे. (जयपूर शहराचे फोटो काढून मी स्वतः प्रशासनाला दिले होते, परंतु त्याकडे लक्ष दिले गेलेले दिसत नाही)

पुण्याला ऐतिहासिक, नैसर्गिक वारसा आहे व स्वतंत्र अशी ओळख आहे, ही शहराची ओळख जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण याबात योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती वंदना चव्हाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.